उमरगा(प्रतिनिधी)- उमरगा येथील खळबळजनक अभिषेक कालिदास शिंदे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात उमरगा पोलिसांना यश आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून अभिषेकच्याच दोन मित्रांनी त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत मोबाईल सीडीआर आणि गुगल मॅपच्या टाईमलाईनचा वापर करून दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. अक्षय राजाराम सारोळे (वय 22, रा. बँक कॉलनी, उमरगा) आणि संदीपमधुकर लोहार (वय 24, रा. सुविधा हॉस्पिटलमागे, उमरगा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे की, 25 जुलै 2025 रोजी कालीदास संभाजी शिंदे रा. मुन्शीप्लॉट उमरगा यांनी पो.स्टे. उमरगा येथे येवुन त्यांचा मुलगा अभिषेक कालीदास शिंदे वय 23 वर्षे रा. मुन्शीप्लॉट उमरगा याची हरवल्याची तक्रार उमरगा पोलिसात दिली होती. त्याच दिवशी त्याचा मृतदेह उमरगा शहरा लगत असलेल्या बायपास जवळील खड्ड्यात आढळून आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. उमरगा येथील रुग्णालयाने मयत शिंदे याचा पोस्टर्मार्टम अहवालात मयताचा धारदार हत्याराने जखमा झालेने त्याचा मत्यु झाला बाबत अभिप्राय दिल्याने  मयताचे वडील कालीदास संभाजी शिंदे रा. मुन्शीप्लॉट उमरगा यांनी दिलेल्या तक्रारी वरून पो.स्टे. उमरगा गु.र.नं. 506 / 2025 कलम 103 (1), 3 (5) भा.न्या.सं प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. व फिर्यादी यांनी महिला नामे 1) सरोजा उर्फ सरूबाई ज्ञानेश्वर चिकुंद्रे वय 41 वर्षे, रा. एकोंडी रोड उमरगा ह.मु. महाकाली कलाकेंद्र येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव, 2) अनिता सतिश जाधव वय 35 वर्ष रा. डिग्गी रोड उमरगा ह.मु. महाकाली कलाकेंद्र येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव व 3) रेणुका उर्फ रूपाली सुर्यकांत पवार वय 33 वर्ष रा. माडज ता. उमरगा, ह.मु. महाकाली कलाकेंद्र येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांचेवर संशय व्यक्त करून त्यांनीच यातील मयताचा खुन केल्याची तक्रार दिल्याने गुन्हयाचे तपासात महिला नामे 1) सरोजा उर्फ सरूबाई ज्ञानेश्वर चिकुंद्रे, 2) अनिता सतिश जाधव, 3) रेणुका उर्फ रूपाली सुर्यकांत पवार यांना दि. 10 ऑगस्ट रोजी  गुन्हयाचा तपास केला असता सदर महिला आरोपी पैकी महिला नामे सरोजा उर्फ सरूबाई ज्ञानेश्वर चिकुंद्रे ही मयत अभिषेक शिंदे याचेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. यातील मयत हा दारू पिवुन तिला सतत त्रास देत असल्याने ती त्यास सोडुन तिच्या बहिणी सोबत महाकाली कला केंद्र येरमाळा येथे राहत असुन अभिषेक शिंदे याचे अमोल कावारे याचे सोबत यापुर्वी भांडण तक्रारी होवुन हाणामारी झाली होती असे अटक महिला आरोपी यांनी तपासात सांगितले. 


तपासांती गुन्हा कबूल  - अमोल कावारे यास चौकशीकरीता बोलावुन घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दि.24 जुलै  रोजी संध्याकाळी त्याचे रिक्षामध्ये प्रवाशी घेवुन सास्तुर येथे गेलो असता रात्री 20:30 वा. सु. अक्षय राजाराम सारोळे वय 22 वर्षे रा. बँक कॉलनी उमरगा यांने मोबाईलवर कॉल करून मी अभिषेक शिंदे यास मारून टाकले आहे असे सांगितल्याची महत्वपुर्ण माहिती दिली.शिंदे अभिप्राय विचारला असता यातील मयताचा धारदार हत्याराने जखमा झालेने त्याचा मत्यु झाला असल्याची माहिती समजली.


आरोपी गजाआड- 

या तपासात पोलिसांना एका साक्षीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. अक्षय सारोळे याने 'मी अभिषेकला मारून टाकलेआहे' असे फोनवर सांगितल्याचे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षय सारोळेला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलचे सीडीआर आणि गुगल मॅपमधील टाईमलाईन तपासली असता, घटनेच्या वेळी त्याचे

लोकेशन घटनास्थळावरच असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी खाक्या दाखवताच अक्षयने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपला मित्र संदीप लोहार याच्या मदतीने खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे संदीप लोहारला कोल्हापूर येथील कागल एमआयडीसीमधून अटक केली.


खुनाचा खुलासा -  24 जुलै रोजी अक्षय, संदीप आणि मयत अभिषेक हे तिघे मिळून एका बारमध्ये दारू पीत होते. यावेळी अभिषेकने दोघांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याचा राग आल्याने दोघांनी अभिषेकला दारू पाजून स्कुटीवर बसवून घटनास्थळी नेले आणि धारदार दगडाने डोक्यात, गळ्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह खड्डयात फेकून ते तुळजापूर, सोलापूरमार्गे कोल्हापूरला पळून गेले होते.


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शफकत आमना,उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी  सपोनि श्रीकांत भराडे,   सपोनि पांडुरंग कन्हेरे, सपोनि रामहरी चाटे पोहेकॉ चैतन्य कोनगुलवार, पोकॉ यासिन सय्यद, पोना अनुरुद्र कावळे, पोकॉ नवनाथ मोरे त्यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्रीकांत भराटे करीत आहेत.


 
Top