धाराशिव (प्रतिनिधी)- पतसंस्था शिक्षकांना भक्कम आधार आहे. काटकसर व आर्थिक शिस्त असल्याने ही संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. संस्थेची अशीच प्रगती पुढे वृद्धीगत होईल. ही संस्था सहकार महर्षी पुरस्कारासाठी निश्चितच पात्र होईल. असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले. यावेळी मयत सभासद दरेकर कुटुंबीयांना 17 लाख रुपये मदत देण्यात आली. 

 ते भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था म. धाराशिवच्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता येथील पुष्पक मंगल कार्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे होते. यावेळी व्यासपीठावर जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, पतसंस्था संस्थापक एम.डी. देशमुख, मुख्य प्रवर्तक पी. एन.चव्हाण, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, निवडणूक निर्णय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुंडे, वसंतराव भोरे, जयपाल शेरखाने, व्ही. के. देशमुख, रामेश्वर चव्हाण, प्रा.अंकुश नाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वसंतराव नागदे, एम.डी. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी 25 सेवानिवृत्त सभासदांचा सपत्नीक सत्कार पुष्पहार,शाल, सन्मानचिन्ह व फेटा बांधून करण्यात आला. महात्मा फुले विद्यालय ताकविकी चे सहशिक्षक संस्थेचे सभासद असलेले दत्तात्रय दरेकर यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पत्नी सखुबाई दत्तात्रय दरेकर यांना कर्ज वजा जाता 17 लाख 13 हजार 334 रुपये आर्थिक मदत संस्थेच्या कुटुंब कल्याण निधीच्या व्याजातून धनादेश देऊन करण्यात आली. सचिव अमरसिंह देशमुख यांनी सभेचे अहवाल वाचन केले.

सभेचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे यांनी केले. तर सूत्रसंचालन संचालक बालाजी तांबे यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी संचालक विजयकुमार कुलकर्णी, उत्तरेश्वर चव्हाण, बाळासाहेब नरवडे, अमोल सरवळे, रवींद्र शिंदे, विलास खरात, ललिता लोमटे,सिंधू कांबळे, कर्मचारी करण पेठे, संतोष मोरे यांनी परिश्रम घेतले.या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत पडवळ यांनी मानले.

 
Top