कळंब (प्रतिनिधी)- शहराला मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडर रद्द करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता मात्र त्याला यश आले नाही. अखेर शहरातील 68 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळे दूर झाले असून प्रत्यक्ष काम या येणाऱ्या सप्टेंबर पासून सुरु होणार आहे त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी दि. 23 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
शहराचा विस्तार दिवशीने दिवस वाढत आहे. जुन्या लोकसंख्येनुसार असलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी येत होत्या. 22 जुलै 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, सुवर्णा मुंडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला होता. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील तसेच नंतरच्या काळात माजी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या सहकार्यातून तांत्रिक मान्यता मिळाली. अखेर या योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. शिवसेनेचे समन्वयक नितीन लांडगे यांच्या सहकार्याने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्योन योजनेतून मंजुरी मिळाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून या योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. असे मुंदडा यांनी सांगितले. प्रसंगी तालुकाप्रमुख सचिन काळे, सागर मुंडे, शहर प्रमुख विश्वजित जाधव, उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, उपशहर प्रमुख निर्भय घुले आदी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.