धाराशिव  (प्रतिनिधी)-  जिल्हा प्रशासन आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने केंद्र सरकारच्या आर्थिक समावेशन संपृक्तता मोहिमेचा प्रारंभ जिल्ह्यात झाला असून,ही मोहीम 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत शून्य शिल्लक रकमेवर जनधन खाते उघडणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,अटल पेन्शन योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.याबरोबरच जुन्या व निष्क्रिय खात्यांसाठी री-केवायसी प्रक्रिया राबवली जाणार आहे,अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.चिन्मय दास यांनी दिली. ही मोहीम केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. 

मोहिमेदरम्यान नागरिकांना डिजिटल फसवणुकीपासून बचाव,तसेच आरबीआयकडे वर्ग झालेल्या दावा न केलेल्या ठेवांबाबत माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत,खासगी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँका मोहिमेत सक्रिय सहभागी आहेत.यासाठी ग्रामपंचायती,बँक शाखा आणि ग्राहक सेवा केंद्रांमार्फत शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरांसाठी ग्रामसेवक, तलाठी व पंचायत प्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिक,बचत गट, ग्रामस्तरीय अधिकारी व पंचायत प्रतिनिधींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि अधिक माहितीसाठी जवळच्या बँक शाखा किंवा जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.चिन्मय दास यांनी केले आहे.


 
Top