धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (धाराशिव विभाग) तर्फे विविध सामाजिक घटकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे लाखो प्रवाशांना प्रवाससुविधा मिळाल्या आहेत.एप्रिल 2024 ते मार्च 2025 या आर्थिक वर्षात विभागामार्फत चालनात असलेल्या एस.टी.बसने विविध घटकातील नागरिकांनी प्रवास करून या योजनेचा लाभ घेतला आहे.

यामध्ये 97 हजार 452 विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन प्रवासासाठी लाभार्थी ठरले.महिलांच्या सन्मानासाठी सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेचा तब्बल 1 कोटी 33 लक्ष 94 हजार 654 महिला प्रवाशांनी लाभ घेतला आहे.समाजातील वयोवृद्ध घटकांनाही या योजनेतून मोठा दिलासा मिळाला आहे.त्यानुसार 65 ते 75 वयोगटातील 16 लक्ष 40 हजार 858 ज्येष्ठ नागरिकांनी सवलतीत प्रवास केला. तर 75 वर्षांवरील 1 कोटी 26 लक्ष 5 हजार 810 अमृत जेष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला.या सर्व लाभार्थ्यांचा मिळून एकूण आकडा तब्बल 2 कोटी 77 लक्ष 38 हजार 774 इतका झाला आहे.

यासोबतच प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी धाराशिव विभागात नवनवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात 55 नवीन लालपरी बस तसेच पर्यावरणपूरक 5 ई-बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर तर होतोच,शिवाय प्रदूषण नियंत्रणातही हातभार लागत आहे.

धाराशिव विभागाने दिलेल्या या आकडेवारीवरून एस.टी.महामंडळाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.विद्यार्थ्यांपासून ते महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांसाठी सुरू असलेल्या या सेवा ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार ठरत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती जाहीर करताना,विभागाने “जनतेसाठी सुरक्षित,स्वस्त व सुलभ प्रवास” हीच आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

 
Top