धाराशिव  (प्रतिनिधी)- येत्या 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे.धाराशिव शहरात विविध गणेश मंडळाकडून गणेश मूर्तीची विविध ठिकाणी स्थापना करण्यात येणार आहे.गणेश उत्सवादरम्यान आनंदाचे व भक्तिमय वातावरण राहणार आहे. गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना तसेच भाविकांना अडचणीचा सामना करण्याची वेळ येऊ नये,यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधित विभागांना दिले. 

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी आज धाराशिव शहरातील गणेश स्थापना व विसर्जन मार्गाची पाहणी केली. गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणाऱ्या हातलाई देवी मंदिर परिसरातील तलाव व समता चौकातील सार्वजनिक विहिरीला भेट देऊन पाहणी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,पोलीस निरीक्षक कुमार दराडे व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पुजार म्हणाले की,विविध गणेश मंडळाकडून ज्या ज्या ठिकाणी गणरायाची स्थापना होणार आहे,त्या ठिकाणी गणेश मंडळाला कोणत्याही अडचणी येणार नाही याकडे लक्ष द्यावे.गणरायाची स्थापना होणाऱ्या ठिकाणी स्वच्छता असावी.गणेश मंडळांना व मिरवणुकीला अडथळा येणारे व अतिक्रमण केलेले असल्यास ते तातडीने हटविण्यात यावे.आवश्यक त्या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही व रस्त्यांमध्ये अडथळा येणार नाही याकडे लक्ष द्यावे.गणेश मंडळांनी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. वीज वितरण विभागाने विद्युत तारा ह्या व्यवस्थित असल्याची खात्री करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी. गणेश मंडळांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि कचरा टाकण्यासाठी कचरापेटीची व्यवस्था करावी.असे त्यांनी सांगितले.

ज्या मार्गाने गणेश विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे त्या मार्गावरील खड्डे बुजवण्याची कामे तातडीने सुरू करावी असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरणारी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावी.चौका चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गणेश मंडळांनी तसेच सेवाभावी संस्थांनी करावी.मिरवणुकीमध्ये कोणीही मद्यप्राशन करून असणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.हातलाई देवी मंदिर परिसरातील तलाव येथे गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असल्यामुळे मोठ्या मूर्तींची विसर्जन करण्याची करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करावी.पोलिसांनी मिरवणूक व विसर्जन ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवावा. विसर्जन ठिकाणी घरगुती मूर्तींना एकत्र करून नगरपालिका व पोलीस विभागाने गणरायांचे विसर्जन करावे.तलावात जीवनरक्षक तैनात करावे.कोणालाही पाण्यात उतरू देऊ नये.कोणीही नशा करून पाण्यात उतरणार असेल तर त्याचा त्वरित बंदोबस्त करावा.असे ते म्हणाले. 

विसर्जन ठिकाणी येणाऱ्या गणरायाच्या मूर्ती येण्याचा मार्ग व गणेश मंडळांना गणेश विसर्जन केल्यानंतर जाण्याचा मार्ग निश्चित करावा.निर्माल्य कोणीही तलावात टाकणार नाही,यासाठी तलाव व विहीर परिसरात कृत्रिम हौद तयार करावे,म्हणजे पूजेचे साहित्य व निर्माल्य एकाच ठिकाणी जमा करता येईल असे श्री पुजार यांनी यावेळी सांगितले.

गणेश विसर्जनासाठी ज्या मार्गाने गणरायाची मिरवणूक जाणार आहे,त्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक,संत गाडगेबाबा चौक,जिल्हाधिकारी निवासस्थान,काळा मारुती चौक,लेडीज क्लब व बार्शी नाका जिजाऊ चौक तेथून पुढे बार्शी मार्गावरील हातलाई देवी तलाव आणि परत समता कॉलोनी या मार्गाची जिल्हाधिकारी श्री.पुजार व पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाच्या उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.


 
Top