तुळजापूर (प्रतिनिधी)- ऑनलाइन गेमिंगला शासनाची बंदी असताना देखील अधिक पैशाचे आमिष दाखवून तुळजापूरमधील नागरिकाला तब्बल 16 लाख 85 हजार 498 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी तुळजापूर तालुक्यातील शुक्रवार पेठ कणे गल्ली येथील कालीदास लिंबाजी गवळी (वय 54) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांचा मुलगा कृष्णा यास एक्सचेंज डॉट कॉम या बनावट लिंकद्वारे आकर्षित करून ऑनलाईन व्यवहार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शासनाच्या बंदीचा भंग करून दिलेल्या या लिंकद्वारे विविध मोबाईल क्रमांकांवरून (9091915891, 9561463808, 8485017490, 8766406507, 8446223584, 8010781839, 8446964554, 73918220088) व्हॉट्सॲपवर संदेश पाठवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादी व त्यांचा मुलगा कृष्णा यांची 16 लाख 85 हजार 498 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. घटनेची माहिती मिळताच सायबर पोलीस ठाणे तुळजापूर येथे दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी भा.दं.वि. कलम, 78 तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(सी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी अनोळखी लिंक किंवा मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या संदेशांना बळी न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.