धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य परिवहनच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या चालक आणि वाहक यांच्या हक्काच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या 15 ऑगस्ट पासून चालक व वाहकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
आगार स्तरावरील त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने एसटीचे चालक आणि वाहकांनी संपाचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी त्यांनी आगार व्यवस्थापकांना पत्राद्वारे सूचित केले आहे. नियमानुसार आपत्कालीन भत्ता देण्यात यावा. सेवा जेष्ठतेनुसार राज्य परिवहन महामंडळामध्ये कर्तव्य द्यावे. सेवा जेष्ठतेनुसार रोटेशन तालिका व्हावी. मुंबई ,बोरिवली, भिवंडी पायलट कर्तव्याचा पूर्ण मोबदला नियमानुसार देण्यात यावा ,अन्यथा इतर आगारामध्ये स्क्रू सुविधा देण्यात यावी. इत्यादी मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.
त्यावरती तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी नसता स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र आगार व्यवस्थापकांना दिले असून त्याच्या प्रती राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिवचे पालकमंत्री, विभाग नियंत्रक धाराशिव, विभागीय वाहतूक अधिकारी, कामगार अधिकारी, पोलीस निरीक्षक आनंदनगर धाराशिव, विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर वाहक ए.डी. शिरसकर, चालक एल.बी. सय्यद, वाहक के.बी. गायकवाड, चालक व्हि.टी. मुंडे, चालक एन. व्ही. रपकाळ, चालक जी.के. कात्रे, वाहक सौ. एम. एस. राऊत यांच्यासह 53 कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. यामध्ये आणखी काही कर्मचारी सामील होण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले.
श्रावण महिना आणि आगामी सणासुदीच्या दिवसात या उपोषणास्त्रामुळे एसटीची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.