तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या अखेरच्या निर्णायक लढ्यास बळ देण्यासाठी ‘चलो मुंबई' आंदोलनाला तुळजापूर तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील 1025 वाहने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मराठा सेवक तेजस बोबडे यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या चावडी बैठकीस प्रचंड गर्दी झाली. ग्रामीण भागातील तरुणांसह महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. काही गावातील समाजबांधव थेट आंतरवालीहून जाणार असून, उर्वरित विविध मार्गे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. या बैठकीत महेश गवळी, तेजस बोबडे, अजय साळुंखे, कुमार टोले, सत्यजित साठे आदी मराठा सेवकांनी समाजाच्या हक्कांसाठी शांततापूर्ण पण ठाम लढा देण्याचे आवाहन केले.
“प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांच्या पाठीमागे समाजाने खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असा ठाम सूर यावेळी उमटला. राजकीय पक्षांत विखुरलेला मराठा समाज जरांगे-पाटील यांच्या आरक्षण आंदोलनामुळे एकवटत असून, 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जाणाऱ्या मोर्चात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने वाहनांसह भोजनव्यवस्था करून सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.