मुरुम (प्रतिनिधी)- 15 जुलै 2025 जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करीअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संसद' पदाधिकारी यांचा शपथविधी सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते.
करिअर कट्टाच्या माध्यमातून महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी “करिअर संसद सदस्य“ म्हणून शपथ घेतली. प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थी संसद पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. तसेच विद्यार्थ्यांना करिअर निवड, कौशल्य विकास, आणि उद्योजकता याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीकडे लक्ष न देता कौशल्य, उद्योजकता आणि नावीन्य यांचा विचार करून आपले भविष्य घडवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘करिअर संसद' उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये करिअरबाबत जागरूकता निर्माण करणे, योग्य मार्गदर्शन पोहोचवणे आणि नेतृत्वगुणांचा विकास साधणे यासोबतच या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधींचे भान येते, तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. यावेळी निवड झालेल्या सदस्यांना प्राचार्य संजय अस्वले यांनी शपथ दिली.
यावर्षीच्या करिअर संसदेत कु. अनिशा सुरवसे (मुख्यमंत्री), कटके निरंजन (नियोजन मंत्री), प्रसाद मंमाळे (उद्योजकता विकास मंत्री), कु.प्रियंका इंगळे (महिला व बालकल्याण मंत्री), प्रज्वल चव्हाण (संसदीय कामकाज मंत्री), अश्विनी पाटील (कौशल्य विकास मंत्री), सैफ इनामदार (स्वयंरोजगार मंत्री), पद्मिनी हळनुरे (कायदे व शिस्तपालन मंत्री) अशा अकरा करिअर संसद सदस्यांना यावेळी शपथ देण्यात आली.
या शपथविधी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक अशोक पदमपल्ले, करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. चंद्रसेन करे, डॉ. समाधान पसरकल्ले, डॉ. विनोद देवकर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आनिशा सुरवसे यांनी केले तर उपस्थित आमचे आभार प्रज्वल चव्हाण यांनी मानले.