उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे माहेरची ओढ उपक्रमांतर्गत वैशाली कैलास आष्टे आणि विद्या दुष्यंत पाटील यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्याकडे आर्थिक मदत सुपुर्द केली. 'माहेरची ओढ' या उपक्रमाच्या संकल्पक सरिता उपासे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. प्रत्येक विवाहीत स्त्रिला आपल्या माहेरबद्दल एक प्रकारची ओढ असते.

आपले माहेरातील घर, शेती, शेजारी, भावकी व एकूणच माहेरचे गाव याबद्दल आपुलकी असते. या आपुलकीलाच सकारात्मक आणि सक्रिय रूप देण्याची संकल्पना मांडली. या अंतर्गत प्रत्येक स्त्रीने आपल्या माहेरच्या शेतात एक फळाचे झाड लावावे. जेणेकरून पुढील चार-पाच वर्षात त्याला फळ येईल. तसेच माहेरच्या गावातील शाळेतील गरजू विद्यार्थ्यीनीला शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी मदत करणे तसेच आपल्या वाढदिवसाच्या दिवशी माहेरातील शाळेस एक पुस्तक भेट देणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.

सरिता उपासे यांनी ही संकल्पना आपल्या मैत्रीणीसमोर मांडली. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. या महिला स्वतः आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी करून घेत आहेत. आपल्या माहेरच्या मैत्रीणीशी संपर्क साधून या उपक्रमाचे स्वरूप समजून सांगत आहेत. ही एक प्रकारे साखळी वाढत चालली आहे. उमरगा तालुक्यासोबतच इतर तालुका आणि जिल्ह्यातही हा उपक्रम राबविला जात आहे. जि. प. प्रशालेत गरजू विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्यासाठी वैशाली कैलास आष्टे आणि विद्या दुष्यंत पाटील यांनी आर्थिक मदत मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली.  याप्रसंगी साधन व्यक्ती अयोध्या चिगुरे, शशीकला राठोड, पार्वती माशाळकर, रमेश ममाळे, सहशिक्षिका शिल्पा चंदनशिवे, गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

 
Top