धाराशिव (प्रतिनिधी)- आकांक्षित जिल्हा म्हणून निवडलेल्या जिल्ह्याला भारत सरकारच्या उपभोक्ता मामले, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या पथकाने 14 आणि 15 जुलै 2025 रोजी अचानक भेट दिली. या पथकाचे नेतृत्व भारतीय अन्न महामंडळ, झोनल कार्यालय नोएडाचे जनरल मॅनेजर सुधीर कुमार यांनी केले.या भेटीत जिल्ह्यातील अन्नसुरक्षा आणि वितरण व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले.
पथकाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची सदिच्छा भेट घेऊन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्नवितरण योजनांची सविस्तर माहिती दिली. पथकाने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन पीएमजीकेवाय योजना, ई-केवायसी, फोर्टिफाईड तांदूळ, आधार व मोबाईल संलग्न रेशन कार्ड यासारख्या विषयांवर लाभार्थी व रास्त भाव दुकानदारांशी थेट संवाद साधला.
जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या “समाधान ॲप”मुळे लाभार्थ्यांच्या तक्रारी वेळेत सोडविल्या जात असल्याबाबत आणि संपूर्ण पीडीएस णालीतील पारदर्शकतेबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.तसेच ‘वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला. दि.19 जुलै रोजी होणाऱ्या 1 कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत आळणी गावात वृक्षारोपण करून पथकाने सहभाग नोंदवला.शहरी भागातील रेशन दुकान आणि जिल्ह्यातील गोदामांची प्रत्यक्ष पाहणी केली. राज्यात जिल्ह्याचे ई-वितरण प्रणालीचे कामकाज आघाडीवर असल्याचे विशेष उल्लेख करून प्रशंसा करण्यात आली. या दौऱ्याद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी केलेल्या उपाययोजनांचा सखोल अभ्यास करत पथकाने समाधान व्यक्त केले आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.