धाराशिव (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुरुपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने रविवारी, 13 जुलै रोजी शिवसृष्टीनगर येथील श्रीकृष्ण मंदिरात गुरुपूजनाचा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. रवींद्र कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी एकलव्य व द्रोणाचार्य यांचे उदाहरण देत गुरुपूजनाच्या परंपरेचा गूढार्थ उलगडला. “गुरु हा केवळ व्यक्ती नसून विचार, संस्कार आणि दिशा दाखवणारा असतो,” असे ते म्हणाले. त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व पटवून देताना समर्पण म्हणजे काय, याचे प्रभावी विवेचन केले. या कार्यक्रमाला धाराशिव शहर संघचालक डॉ. रमेश जावळे हेही उपस्थित होते. सायंकाळी सात ते आठ या वेळेत झालेल्या कार्यक्रमात संघाच्या व्यावसायिक विभागातील तरुण व प्रौढ कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपूजन सप्ताहाच्या निमित्ताने शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 11 जुलै रोजी श्री रामकृष्ण तरुण व प्रौढ व्यावसायिक शाखेचा कार्यक्रम श्री काळाराम मंदिर, भवानी वस्तीत झाला. यामध्ये प्रशांत महाजन यांनी मार्गदर्शन केले. 12 जुलै रोजी केशव प्रभात शाखेचा कार्यक्रम श्रीराम मंदिर, समर्थ नगर येथे पार पडला, ज्यात अजय जानराव यांनी उपस्थितांना संबोधित केले. तर 13 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर शाखेचा कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिरातच झाला. यामध्ये ॲड. रवींद्र कदम यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यास मिळाले. गुरुपूजन हा कार्यक्रम संघ जीवनात निष्ठा, शिस्त आणि समर्पणाची जाणीव करून देणारा असतो. त्यामुळे संघाच्या विविध शाखांमध्ये जिल्हाभरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.

 
Top