धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या बेदम मारहाणीचा धाराशिव येथे तीव्र निषेध करण्यात आला. छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर धडकले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयासमोरील बॅनर फाडले. काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सोमवार दि. 21 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकेर धाराशिव शहरात आले होते. ताणतणावात तटकरे यांना आपला दौरा आटोपटा घ्यावा लागला. लातुरातील मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.