धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील धाराशिव नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नुकतेच लावण्यात आलेल्या लोखंडी गेटमुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नवीन गेट बसवल्यामुळे पालिकेत येणाऱ्या लोकांसाठी मुख्य रस्ता अडथळा निर्माण करणारा ठरत आहे. या गेटमुळे पालिकेच्या समोर वाहन उभे करणे जवळजवळ अशक्य झाले असून, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वाहन रस्त्यावरच लावावी लागत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढली आहे.

नगरपालिका परिसरातील ही व्यवस्था पूर्णतः अकारण व नागरिकविरोधी आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. विशेषतः दिवसभरात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना या गेटमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नागरिकांचा अभिप्राय न घेता हा गेट बसविल्याचा प्रकार, प्रशासनाच्या दंडेलशाही वृत्तीचे दर्शन घडवत आहे. नागरिकांनी मागणी केली आहे की, तत्काळ या गेटबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलना शिवाय पर्याय राहणार नाही.


 
Top