धाराशिव (प्रतिनिधी)- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी दुपारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शोभा जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे समोर येऊन चर्चा करत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
जिल्हाधिकारी पुजार हे मीटिंगमध्ये असल्यामुळे कार्यालयात उपस्थित नव्हते. मात्र जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आले नाहीत, तोपर्यंत आंदोलकांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. अखेर दहा मिनिटांनी जिल्हाधिकारी पुजार कार्यालयात आले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांचा खून करण्याचा डाव होता. त्यामुळे त्यांच्यावर खुनी हल्ला प्रकरणी कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आंदोलकांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. प्रवीण गायकवाड रविवारी अक्कलकोट येथे एका कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर तिथे त्यांच्यावर शाई फेकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. संबंधित हल्लेखोरांच्या पाठीशी असलेल्या प्रतिगामी शक्तींच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. धाराशिवमध्ये दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने आज या घटनेचा तीव्र निषेध केला. यामध्ये सर्व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.