ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी ढोकी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याची फळ रोपवाटिका असून शासनाच्या मालकीची गट क्रमांक 35 मधील 16 हेक्टर 68 आर जमीन आहे. ढोकी गावातील एका विशिष्ट समाजातील घटकांचा या जमिनीवर डोळा असून, सदर जमिनीवर आत्तापर्यंत अनेक वेळा अतिक्रमण झाले आहे. शासनाने ही अतिक्रमणे वेळोवेळी काढली तरी काही काळानंतर पुन्हा अतिक्रमण केले जाते. आत्तापर्यंत फळ रोपवाटिकेतील मालमत्तेची सुमारे एक कोटी रुपयांची नुकसान केली आहे. त्यांना कायद्याचा कसलाही धाक राहिलेला नाही. त्यांचे विरुद्ध आत्तापर्यंत अतिक्रमणाबाबत फौजदारी गुन्हे दाखल न केल्यामुळे पुन्हा पुन्हा अतिक्रमण केले जाते.
10 जुलै पर्यंत परिणामकारक कृती न झाल्यास ढोकी येथे दि. 10 जुलै रोजी ढोकी गाव बंद करून ढोकी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केले जाईल. तसेच 17 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.असा ईशारा देण्यात आला. या निवेदनावर अ.गफार काझी, अमोल समुद्रे, संग्राम देशमुख, निहाल काझी, आयुबखा पठाण, माणिक वाकुरे, श्रीहरी माळी, परवेझ अ.बारी काझी, राहुल पोरे, अंकुश जाधव, दौलतराव गाढवे, अतुल लोहार, विलास रसाळ, सुरेश कदम, आरेफ काझी, राजवर्धन भुसारे, राजेंद्र पाटील, ईमरान शेख, अरुण देशमुख, संजय शिंदे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
धमक्या देतात
अतिक्रमणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना व निवेदन देणाऱ्या व्यक्तींना सदरील घटकांकडून धमक्या दिल्या जातात. त्यामुळे सदर अतिक्रमण काढून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.उपरोक्त अतिक्रमण तात्काळ काढून संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हे नोंदवावीत अशी मागणी करण्यात आली. दिनांक 19.6.2025 रोजी याविषयी जिल्हाधिकारी ढोकी दौऱ्यावर असताना ढोकी ग्रामस्थांनी समक्ष निवेदन दिले आहे. या निवेदनावर कसलीही कृती झालेली नाही.