धाराशिव (प्रतिनिधी)- आळणी, ता. धाराशिव  आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या दिंडीमध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंगाच्या गजरात आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल“ च्या घोषात सहभाग घेतला.

दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून करण्यात आली. व संपूर्ण अळणी गावातून दिंडी निघाली,विद्यार्थ्यांनी पांढरे वेश परिधान करून डोक्यावर फेटे, हातात टाळ, गळ्यात तुळशी माळ आणि मुखाने हरिनाम घेत शिस्तबद्ध रांगेत चालत परिसरातून दिंडी काढली. काही विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमात आकर्षण ठरले. या दिंडीमधून विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे महत्त्व, भक्तीमार्गाची प्रेरणा आणि एकतेचा संदेश दिला. दिंडीत मुस्लिम धर्मीय मूले व मुलींनी ही वारकऱ्यांचा वेष परिधान करून दिंडीत सहभाग घेतला व एकतेचे दर्शन घडविले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बशीर तांबोळी, शिक्षक वृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडी कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थांनी रिंगण करून, फुगडी खेळून माऊलींचा जयघोष केला. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शिक्षकांनी संयुक्तरित्या केले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव पाहून उपस्थित सर्वांनी कौतुक केले. हा दिंडी सोहळा शाळेच्या विद्यार्थ्यांना अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव करून देणारा ठरला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, संघभावना आणि वारकरी परंपरेची जपणूक या बाबी रुजल्या.


 
Top