धाराशिव (प्रतिनिधी)- 5 मार्च 2025 च्या आदेशानुसार 16 एपिल रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढली होती. त्यानंतर ओबीसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाला आला. या निकालानंतर 10 जुलैला सरपंच पदासाठी पुन्हा एकदा आरक्षण सोडत होणार आहे. अशी माहिती महसूल सहाय्यक अधिकारी एस. बी. गाढवे यांनी दिली आहे.
पु. वि. लोकराज्य ने 2 जुलै रोजी आपल्या बातमीत म्हणल्या प्रमाणे नव्या आरक्षण सोडत मध्ये दोन जागेचाच बदल होणार आहे. खुला प्रवर्गातील पूर्वी 342 सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात आले होते. 10 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या आरक्षणामध्ये खुल्या प्रवर्ग महिला व पुरूष साठी 340 जागेचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 166 सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. 10 जुलै रोजी नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला व पुरूषासाठी 168 सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. नव्या आरक्षणानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गमधील 2 जागा वाढणार आहेत. तर खुल्या प्रवर्गातील 2 जागा कमी होणार आहेत.
10 जुलै रोजी जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पुन्हा नव्याने निघणार आहे. ग्रामविकास विभागाने 6 मे च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 जून 2025 रोजी नवीन अधिसूचना जाहीर केली. ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग इत्यादीसाठी सरपंच पदांच्या राखीव जागांमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व 13 जून 2025 च्या अधिसूचनेचा आधार घेऊन ग्रामविकास विभागाने 16 जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याबाबत लेखी निर्देश दिले आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही करून 15 जुलै पर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याचा स्पष्ट आदेश दिला आहे.
येत्या 10 जुलै रोजी तालुका पातळीवर पुन्हा एकदा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतीसाठी ही आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार धाराशिव, उमरगा, कळंब, परंडा आणि तुळजापूर या तालुक्यात ओबीसी व जनरल आरक्षणात बदल होणार आहे. तर लोहारा, वाशी आणि भूम तालुक्यात बदल होऊ शकणार नाही. धाराशिव जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होऊ घातल्या आहेत.