धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आठवड्याला दोन ते तीन लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळे जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अशाच अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. एका घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे तर दुसऱ्या घटनेत एका विवाहितेवर सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देऊन अत्याचार केला आहे.

पहिली घटना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये एका गावातील 17 वर्षीय मुलीवर (नाव- गाव गोपनीय) दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 मे 2025 या दीड वर्षात लैंगिक अत्याचार केला.

त्या अल्पवयीन मुलीला गावातील एका तरुणाने फोन करुन तु मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे असे खोटे सांगून त्याच्या घरी बोलावून घेवून तिच्यावर बळजबरीने लैंगीक अत्याचार केला.

पिडीतेने दिनांक 24 जुलैरोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64(2) (एम), 74, 351(2) सह कलम 4 पोक्सो अन्वये त्या तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. तर दुसरी घटना कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस ठाणे हद्दीत घडली.

एका गावातील 20 वर्षीय विवाहित महिलेवर दिनांक 9 मे 2025 ते 24 जुलै 2025 या अडीच महिन्यांच्या काळात दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. त्या तरुणांनी त्या महिलेचे बाथरूममधील नग्न फोटो काढून महिलेला ब्लॅकमेल केले.

तसेच हे फोटो महिलेच्या पतीला दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी महिलेला देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. पिडीत महिलेने दिनांक 24 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1),64(2) (एम), 87, 351(2), 3(5)अन्वये दोघांवर गुन्हा नोंदवला आहे

 
Top