भूम (प्रतिनिधी)- सध्या भूम नगर परिषदेकडील मुख्याधिकारी निवासस्थान रिक्त असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामासाठी होत नसल्याने, या जागेचा उपयोग भटकंती करणाऱ्या जनावरांसाठी “कोंडवाडा“ उभारण्यासाठी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी गेल्या वर्षभरापासून प्रशस्त निवासस्थानात वास्तव्य करत नसल्याने ही जागा निर्थक पडून आहे. शासनाच्या नियमांनुसार संबंधित अधिकारी ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्याच ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने सदर निवासस्थानाचा शासकीय उपयोग होत नाही.
दरम्यान, नगर परिषद क्षेत्रात भटकंती करणाऱ्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या जनावरांसाठी सुरक्षित निवारा उभारणे अत्यावश्यक बनले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून रिक्त असलेल्या मुख्याधिकारी निवासस्थानाचा उपयोग जनावरांच्या कोंडवाड्यासाठी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
हे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, यावर भाजप शहर सरचिटणीस आबासाहेब मस्कर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, शहराध्यक्ष सचिन साठे, आकाश शेटे, व्यापारी उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, स्वातंत्र सैनिक तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, बन्सी काळे, सिद्धार्थ जाधव, कामगार आघाडी अध्यक्ष निलेश शेळके, मुकुंद वाघमारे , ऋषिकेश खोले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.