विकास उबाळे
कसबे तडवळे - मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र च्या सीमेवर असलेले येडशी गावं धाराशिव तालुक्यातील हे गावं येथील बालाघाट डोंगररांगाच्या कुशीत, निसर्गरम्य परिसरात वसलेल्या तीर्थक्षेत्र रामलिंगची यात्रा या संपूर्ण श्रावण महिन्यात यात्रेचे रूप प्राप्त होते. दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या अभयारण्यात हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे. तीर्थक्षेत्र रामलिंगमध्ये पर्यटना बरोबर धार्मिक भावना असल्याने व निसर्ग सौंदर्याने हा भाग नटलेला आहे.
तसेच रामलिंग गुरुकुल, ब्रिटिश कालीन हिल्सस्टेशन याबरोबर येथे मोठ्या प्रमाणावर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडया मारणारे माकडे पाहण्यास मिळतात. तसेच अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे, वेली, पशुपक्षी व रामलिंग घाट अरण्यचा दोन हजार हेक्टरचा परिसरात विविध प्रकारच्या प्राणी व झाडे पहावयास मिळतात. गेल्या काही दिवसापासून चालू झालेल्या पावसामुळे धबधबा सुरू झाल्याने या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. या निसर्ग सौंदर्य बरोबर ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. प्रभू रामचंद्र, सीतेसोबत वनवासात या अभ्यारण्यात राहिले आहेत, अशी आख्यायिकाअसून महादेव मंदिर, जटायू पक्षी समाधी, जटायू पक्षाला पाणी पाजण्यासाठी प्रभू रामाने बाण मारून पाणी काढले. आजही तीनही ऋतुत या बाण धारेतून पाणी वाहत असते. धार्मिक व नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या परिसरास पावसाने आणखीनच भर टाकल्याने पर्यटक व भाविकाच्या संखेत वाढ होत आहे. ४० लाख रुपये खर्च करून मद्राई येथील कारागिरानी दक्षिण भारतातील मंदिरासारखा लूक दिला आहे. उद्योजक देवदत्त मोरे यांनी संपूर्ण नवीन शिखर बाधंलेआहे, तसेच मंदीर परिसरातील जुन्या दगडी बांधकामच्या ओवऱ्या तशाच ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे जुने व नवीन बांधकाम सुरेखसगंम पाहण्यास मिळत आहे. यामूळे मंदिर पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार करुन मंदिर परिसराचा विकास केल्यास पर्यटकांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे. या रामलिंग मंदिरात संपूर्ण श्रावण महिन्यात धाराशिव, सोलापूर, लातूर, बीडसह राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येडशी व रामलिंग मंदिर परिसरात संपूर्ण श्रावण महिन्यात मोठी गर्दी पहायला मिळते. रामलिंग घाट अभयारण्य हे २ हजार २३६ हेक्टरवर पसरले असून धाराशिव व कळंब या दोन तालुक्यात अभयारण्यकडून पर्यटक व भाविकासाठी बसण्यासाठी बाकडे, माहिती फलक, निवारा, डोंगर कड्या रेलिंगची कामे करण्यात आली आहेत, तसेच निसर्गाशी एकरूप होण्याचा एक सुंदर सोहळा ठरते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि सुट्टयांच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक प्रशासन, मंदिर देवस्थान समिती, पोलीस प्रशासन, वनविभाग, आरोग्य यंत्रणा, महावितरण व एसटी महामंडळ यांनी भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. या तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य भागास भाविक दरवर्षी पूर्ण श्रावण महिन्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.