भूम (प्रतिनिधी)- पंढरपूरहून आषाढी एकादशीची यात्रा करून शेगावकडे परतीच्या मार्गी निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवारी दि. 14 जुलै सायंकाळी साडेसात वाजता शहरात आगमन झाले. यावेळी साहिल सेवाभावी संस्थेच्या वतीने माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व संयोगिता गाढवे यांच्यासह नगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने तसेच गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
या पालखीचा शहरातील कुंतलगिरी रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिरात मुक्काम व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा पालखी सोहळा आषाढी यात्रेसाठी शेगावहून पंढरपूरकडे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जातो. त्यानंतर ही पालखी पंढरपूरवरून भूममधून परतीच्या मागनि जाते. या पालखी सोहळ्यात सातशे वारकरी असून 250 भगव्या पताका खांद्यावर घेऊन श्वेतवस्त्रधारी 250 टाळकरी व 200 सेवेकरी असतात. यंदा पालखीचे 56 वे वर्ष आहे. श्री ची पालखी भूम शहरात शिवाजीनगर मार्गाने दाखल होताच भक्ताकडून श्रीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
सायंकाळच्या सुमारास हा पालखी सोहळा शहरातील आला. त्यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यावरून गजानन महाराज मंदिरात मुक्काम होतो. तेथे भाविक भक्तांनी दर्शनसाठी गर्दी केली होती. भूम शहरात ठिकठिकाणी शहरवासीयांच्या वतीने व्यापाऱ्यांच्या वतीने या पालखी व सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. एक दिवसाच्या मुक्कामात भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दि. 15 जुलै रोजी पहाटे आरती झाल्यानंतर सकाळी कुंथलगिरीमार्गे सरमकुंडी फाट्याकडे पालखी मार्गस्थ होते.
गजानन महाराज व्यापारी संघटनेच्यावतीने वारकऱ्यांची निवास, भोजन व्यवस्थेची सोय करण्यात आली. यावेळी संजय साबळे, सुनिल थोरात, सुरज गाढवे, विष्णू शिंदे ,साहील गाढवे, राम बागडे, बाळासाहेब अंधारे, बाळासाहेब सुर्वे, प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते. संजय साबळे यांच्याकडून जेसीबीद्वारे गजानन महाराज पालखी सोहळ्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला.
वाहतूक विस्कळीत
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त असताना सुद्धा दोन्ही बाजूने येणारे व जाणारे वाहनांचे व्यवस्थित रित्या नियोजन न झाल्यामुळे जिजाऊ चौक ते गजानन महाराज मंदिर या दरम्यान तब्बल तीन तास ट्रॅफिक जाम होऊन भाविक भक्तांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागला. पोलीस प्रशासनाचे गर्दीच्या नुसार वाहन पार्किंग व ये-जा करणाऱ्या वाहनांचे नियोजन पूर्णपणे कोल मोडले. त्यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास झाला.