धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील एका 25 वर्षीय युवकाचा खून झाला असताना पोलिसांनी त्याचा खोटा आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप करीत सदर नाभिक समाजातील मयत युवकास योग्य तो न्याय मिळावा व या प्रकरणातील दोघा आरोपींवर खून प्रकरणाचा गुन्हा नोंद करावा या मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नाभिक समाजाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, बाळू तुकाराम पंडित वय 25 वर्ष रा. बँक कॉलनी धाराशिव यांचा दिनांक 17 जून 2025 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास जाहिगरदारवाडी येथील रेल्वेच्या बोगद्यात गंभीर जखमा असलेला मृतदेह आढळला आहे. दि. 18 जून रोजी येडशी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह देण्यात आला होता. व आकस्मात मृत्यू क्रमांक 31/ 2025 नुसार ग्रामीण पोलिस स्टेशन धाराशिव येथे नोंद करण्यात आली. मयत बाळू तुकाराम पंडित याचे हेअर कटिंगचे दुकान होते. इर्शाद इसाक सय्यद व नसरीन फेरोज मजकुरे हे बाळू तुकाराम पंडित याच्या फार जवळचे मित्र होते. नसरीन फेरोज मजकुरे व इर्शाद इसाक सय्यद यांनी बाळू तुकाराम पंडीत याला लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्याबद्दल बाळू पंडीत यांनी त्याच्या आईला वेळोवेळी सांगितले होते.
बाळू पंडीत यांच्या आईने वारंवार ती इर्शाद इसाक सय्यद व नसरीन फिरोज मजकुरे या दोघांना माझा मुलगा बाळूचा नाद सोडून द्या असे सांगितले होते. परंतु त्यांनी ऐकले नाही तरी इर्शाद व नसरीन यांनी बाळू पंडीत यास आमच्या सोबत लग्न कर नाहीतर आम्ही तुझी बदनामी व बघून घेऊ असे दोघेही धमकी देत होते. बाळू पंडीत यास 17 जून 2025 रोजी सायंकाळी 10 च्या वेळेस जाहगिरदारवाडी परिसरातील रेल्वेच्या बोगद्यात नेऊन त्यास मारहाण करून निर्घुणपणे खून करण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिवचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व पोलिस अमंलदार मुक्ता लोखंडे यांनी इर्शाद इसाक सय्यद व नसरीन फेरोज मजकुरे या आरोपीस अटक न करता बाळू पंडीत यांच्या आईस सांगितले की, तुमच्या मुलाने आत्महत्या केली आहे व खून प्रकरण प्रकरण दाबून टाकले आहे. या घटनेतून आरोपी यांना पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी लाच मागून तुमचे या प्रकरणात चौकशी करून नावे कमी करतो असे म्हणून मोठ्या प्रमाणावर लाच घेतली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय धाराशिव यांच्याकडून वरील पोलीस अधिकाऱ्यांना ट्र्ँप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी खुना गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा व शहर शाखा धाराशिवच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून तिव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय राऊत, किशोर राऊत, दाजी पवार, जगन्नाथ पवार, गणेश वाघमारे, लक्ष्मीकांत माने, लिंबराज तुकाराम पंडीत यांच्यासह नाभिक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.