उमरगा (प्रतिनिधी)- राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात बिनधास्तपणे फोफावणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात आमदार प्रवीण स्वामी यांनी अवैध जुगार, गावठी दारू, ऑनलाईन गेमिंग, संघटित गुन्हेगारी व गुटखामिश्रित तंबाखूच्या धंद्यांवर कठोर कारवाई करत ती मुळापासून बंद करावी. अशी मागणी करत विधिमंडळाचे लक्ष वेधले.
उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी गावठी दारू ते ऑनलाईन जुगार, समाजघातक छुप्या भस्मासुरावर आवाज उठवत सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मुद्दे प्रखरतेने मांडले. गावोगावी पुन्हा डोके वर काढणाऱ्या गावठी दारू, गुटखा, जुगार, गुडगुडी या धंदयाविरुध्द विधानसभेत आवाज उठवला. जनतेच्या आरोग्याचा, कुटुंबाच्या भविष्याचा आणि समाजाच्या शिस्तीचा हाच घातक विनाश आहे अशा शब्दांत स्वामी यांनी शासनाला खडबडून जागं केलं. गावखेड्यांत बिनधास्त सुरू असलेली गावठी दारूची भट्टी आज कुटुंबं उद्ध्वस्त करत आहे. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून युवकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे आणि अनेकांना व्यसनाधीन केलं जात आहे. गुटखा व तंबाखूच्या गैरविक्रीने आरोग्याची गंभीर अवस्था झाली असून, आरोग्य विभागही बधिर आहे. तर, संघटित गुन्हेगारी आणि जुगाराचे जाळे पोलीस यंत्रणेलाही अपमानित करत आहेत. अवैध धंद्याचा विळखा शेतकऱ्याच्या घरापासून ते तरुणांच्या मोबाईलपर्यंत पोहोचला आहे. गावागावांतून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे. ऑनलाईन गेमवर कडक नियमावली तयार करुन नियंत्रण आणावे. गावठी दारू भट्टयांविरोधात विशेष मोहिमा राबवाव्यात. गुटखाविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत ती मुळापासून बंद करावी अशी मागणी केली.