तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास एकूण 1865 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विकास आराखड्यानुसार, श्री. क्षेत्र तुळजाभवानी मंदिराजवळील अंदाजे 22,558 चौरस मीटर इतकी खाजगी जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 

एकुण 107 मालमत्ता संबंधित जमिनीवर सध्या वास्तव्य करणाऱ्या किंवा मालकी हक्क असलेल्या व्यक्तींचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण बुधवार दि. 9 जुलैपासुन आरंभ झाले. मालमत्ता  धारकांची संख्या वाढण्याची शक्यता  वर्तवली आहे. प्रथम दिनी पंचवीस टक्के मालमत्ता आसपास सर्वैक्षण काम पुर्ण झाले आहे. सदरील सर्वेक्षण काम तीन दिवसात पुर्ण केले जाणार आहे.

या सर्वेक्षणासाठी एकूण पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील विद्यार्थी, नगर परिषद कर्मचारी, श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे. सर्वेक्षणाच्या प्रक्रियेत संबंधित घरमालक, भोगवटादार किंवा धारक यांची सामाजिक, आर्थिक व वैयक्तिक माहिती संकलित केली जात आहे. संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाणार असून प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार आहे.


नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

सर्वेक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आपली अचूक व सविस्तर माहिती सर्वेक्षण पथकाला द्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वेक्षण प्रक्रियेविषयी नागरिकांच्या काही शंका अथवा अडचणी असल्यास त्यांनी श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


 
Top