धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा रुग्णालयात आता हळूहळू बदल होत चालले आहेत. ऐरवी नेहमी सोलापूर, लातूर रेफर होणाऱ्या रुग्णावर आता याठिकाणी चांगल्या शस्त्रक्रीया होत आहेत. धाराशिव तालुक्यातील कामेगाव येथील रुग्ण दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी होवून जबडा व त्याखालील सर्व दात पुर्णत: निकामे झाले होते. अशा अवस्थेत हा रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. विशेष म्हणजे रक्त थांबण्यास तयार नव्हते. जबड्याची ही किचकट शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसाठी जिकरीचे काम होते. मात्र एमडीएस ओरल सर्जन डॉ. कृष्णा उंद्रे-देशमुख यांनी सदरील रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करत यश संपादन केले आहे. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रीया चालली असून, रुग्ण उपचार पुर्ण करुन तंदुरुस्त होवून आपल्या घरी सुखरुप पोहचला आहे. त्यामुळे रुग्णांसह रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील डॉ. उंद्रे व त्यांच्या सर्व टिमचे आभार मानले आहेत.
धाराशिव तालुक्यातील कामेगाव येथील हनुमंत वेजिनाथ कदम (वय 45) हे दुचाकीवरुन पडून त्यांच्या जबड्यास मोठा मार लागला होता. यामध्ये एक शिरही तुटली होती. खालच्या बाजुचे दात सर्व खिळाखिळा झाले होते. तसेच जबडाही आतील बाजूस सरकला होता. यामुळे रक्तस्त्राव जोरात सुरु होता. अशा अवस्थेत हे 6 जुले 2025 रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. अपघात घडल्यापासून दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत रक्तस्त्राव चालू राहिल्याने रुग्णांची प्रकृती विक झाली होती. त्यामुळे डॉक्टरांपुढे रुग्णांवर शस्त्रक्रीया करणे आव्हान होते. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. शैलेंद्र चौहान तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कृष्णा उंद्रे-देशमुख, असिस्टेंट डॉ. नागेश वाघमारे, भूलतज्ञ डॉ उज्मा आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रीया यशस्वी केली आहे. रविवारी ही घटना घडली होती. त्यामुळे डॉक्टर असतील का नाही, अशी शंका मागील काही अनुभवावरुन होती. मात्र रविवार असतानाही माहिती कळताच डॉ.उंद्रे-देशमुख हे तात्काळ हजर राहिले. त्यांनी रुग्णावर तात्काळ उपचार सुरु केले. हादेखील जिल्हा रुग्णालयातील बदल झाल्याचे यावेळी दिसून आले. रुग्णांचा रक्तस्त्राव थांबत नव्हता, रात्री एक वाजता रक्तस्त्राव थांबवण्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर उपचार करत सोमवारी (दि.14) रुग्णांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. तब्बल तीनतास ही शस्त्रक्रीया चालली. आता रुग्ण पुर्वस्थितीत दिसत असून बुधवारी (दि.16) रुग्ण हनुमंत कदम हे डिस्चार्ज घेवून घरी पोहचले आहेत.
धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात पुर्वीपेक्षा आता मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे त्यांचा चांगला फायदा होत असून रुग्णांना उपचार चांगले मिळत आहेत. अशा अनेक रुग्णांच्या प्रतिक्रीया ऐकावयास मिळत आहेत.