धाराशिव (प्रतिनिधी)- कर्जमाफी करणार असे सरकार निवडणुकीत सांगत होते पण आता त्यावर बोलताना मुख्यमंत्री नियमाची भाषा करतात तर योग्य वेळ असते असं सांगून विषय संपवत आहेत. ती योग्य वेळ कधीची आहे व त्यासाठी काय नियम असतात हे मुख्यमंत्री यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सांगावी असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केले. ते विरोधी पक्षाच्या 293 च्या प्रस्तावावर बोलत होते.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत राज्यातील एक हजार 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या का झाल्या याचा विचार सरकारने केला आहे का? असा सवाल पाटील यांनी सरकारला विचारला. कर्जमाफी करु म्हणणारे सरकार आता त्यापासून दूर पळत आहे. मुख्यमंत्री कर्जमाफी संदर्भात बोलताना म्हणाले की कर्जमाफी करण्याचे नियम असतात. त्याची योग्य वेळ असते. त्याविषयी बोलताना आमदार पाटील यांनी कर्जमाफीची योग्य वेळ कोणती व त्याचे काय नियम असतात ते एकदा राज्यातील शेतकऱ्यांना कळू द्या असे आवाहन केले. कारण कर्जमाफीमध्ये आजवर थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपले कर्ज नियमित न करता ते थकीत ठेवतात. आताही माझ्या जिल्ह्यात 60 टक्के शेतकरी थकीत मध्ये आहेत. मग अजून किती टक्के शेतकरी थकीतमध्ये येण्याची सरकार वाट पाहणार आहे. ती योग्य वेळ नेमकी कधी येणार हे सरकारने स्पष्ट करावं असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.