धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रातला मराठमोळ्या संस्कृतीचा ठेवा जगभर वाखाणण्या सारखा आहे. महर्षी वाल्मिकी महर्षी व्यास, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज अशी मोठी विद्वानांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्यासाठी गुरुपौर्णिमा गुरुपूजन संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही परंपरा जगाला प्रेरणा अन्‌‍ ऊर्जा देणारी आहे. या संस्कृतीचा आदर करून खूप काही घेण्याचा प्रयत्न करतो. असे मत एमआयटी  पुण्याचे कुलगुरू शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत शाखा धाराशिव तर्फे आयोजित गुरू पूजन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पुजेरी बोलत होते. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सोबत तब्बल वीस वर्षे संशोधन क्षेत्रात डॉ. पुजेरी यांनी काम केले आहे. पुजेरी यांनी साधू संतांच्या विचारामुळे महाराष्ट्राची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे असे सांगितले. 

यावेळी राज्य शासनाने  उद्योजक म्हणून पुरस्कार केलेले विनोद जोगदंड व  साहित्य भारतीचे आबासाहेब घावटे यांची कथा कर्नाटक राज्यात तिसरी भाषा मराठीसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा तसेच भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्यावर तयार झालेल्या व दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटा गीत लिहिणाऱ्या साहित्य भारती सदस्या सुरभी भोजने यांचाही सन्मान प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आला. गुरू पूजन कार्यक्रमासाठी देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे, धाराशिव जिल्हा साहित्य भारतीचे अध्यक्ष भागवत घेवारे, ज्येष्ठ कवी राजेंद्र अत्रे, कार्यवाह रविंद्र शिंदे, सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष कविता पुदाले यांच्यासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात साहित्यिक कवींची उपस्थिती होती. माधुरी घोडके यांनी सूत्रसंचालन केले. तर रविंद्र शिंदे यांनी आभार मानले.


 
Top