उमरगा (प्रतिनिधी)- ज्ञानाने संपन्न पिढी हीच राष्ट्राची खरी शक्ती असते. ध्येयवादी शिक्षक आणि गुणवान विद्यार्थी समाजाचे वैभव वाढवित असतात. त्यांना प्रदान केला जाणारा ज्ञानज्योती पुरस्कार हा ज्ञान संस्कृतीचा सार्थ गौरव आहे. असे मत प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ साहित्यीक प्रा.डॉ.यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउददेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दि.6 जुलै रोजी उमरगा शहरातील ओम बालाजी मंगल कार्यालयात आयोजित ज्ञानज्योती गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रा.शिवमूर्ती भांडेकर रा.आलूर (शिक्षण व साहित्य), प्रा.कांतराव सोमवंशी रा.आष्टा का., (प्रसिद्ध बासरीवादक), श्री.योगीराज माने रा.तुगाव (ज्येष्ठ कवी व साहित्यिक), रणजीतसिंह ठाकूर रा.उमरगा (क्रीडा - राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू), देवीसिंग भीमसिंग राजपूत रा.येणेगुर (ज्येष्ठ पत्रकार), गोविंद पवार रा.सास्तूर (प्रगतशील शेतकरी), माधव मारूती जाधव रा.व्हंताळ (आदर्श सरपंच), सौ.वर्षा किशोर माने रा.दाबका (महिला गृह उद्योजिका) यांना यंदाच्या ज्ञानज्योती पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 10 वी वर्गात प्रथम व द्वितीय आलेल्या व इयत्ता 12 वी मध्ये प्रथम (शाखानिहाय) आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिक कांबळे, रा.त्रिकोळी, विशाल शेटगार रा.गुंजोटी, कृष्णा लडडा रा.कलदेव निंबाळा, अंबिका जमादार रा.हिप्परगा राव, ऋतीका भोसले या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संस्थेने दरमहा शिष्यवृत्ती सुरू केली. त्याचा पहिला धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.रविंद्र गायकवाड, उदघाटक माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अभय चालुक्य, किरण गायकवाड, ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा ॲड.आकांक्षा चौगुले, मोहन पणुरे, वैशालीताई खराडे, अमोल राजपुत, शिवकुमार बिराजदार, उषाताई गायकवाड, ज्योतीताई चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.आकांक्षा चौगुले, सुत्रसंचालन संदीप जगताप, आरोही जमादार व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विजय वडदरे यांनी केले.