धाराशिव (प्रतिनिधी)-  संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास अजेंडा 2023 अंतर्गत निश्चित करण्यात आलेली ध्येये व लक्षवेधी उद्दिष्टे हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे मार्गदर्शक आहे.जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू असून विविध सामाजिक,आर्थिक व पर्यावरणीय घटकांमध्ये समन्वय साधणारा एक महत्त्वाचा घटक आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने तयार केलेल्या शाश्वत विकास ध्येय - जिल्हा निर्देशक आराखडा सन 2015 - 16 ते सन 2022 - 23 च्या प्रगतिमापन अहवालाचे प्रकाशन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले. 

यावेळी अपार पोलिस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सुधाकर जाधव,उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी व्ही.के.करे,वन विभागाचे विभागीय वनाधिकारी बी के.पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकाशन करण्यात आलेल्या शाश्वत विकास ध्येये जिल्हा निर्देशक आराखडा सन 2015 - 16 ते सन 2022 -23  च्या प्रगतीमापन अहवालात शाश्वत विकास ध्येय यामध्ये दारिद्य्र निर्मूलन,उपासमारीचे समूळ उच्चाटन,चांगले आरोग्य आणि क्षेमकुशलता,गुणवत्तापूर्ण शिक्षण,लिंग समानता, शुद्ध पाणी व स्वच्छता, परवडण्यायोग्य आणि स्वच्छ ऊर्जा, चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ, उद्योग,नावीन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा,विषमता कमी करणे,शाश्वत शहरे व समुदाय,विवेकी उपभोग व उत्पादन, हवामान बदलासंबंधी कृती,पाण्याखालील जीवन,जमिनीवरील जीवन,शांतता, न्याय आणि सशक्त संस्था आणि ध्येयांसाठी भागीदारी ही 17 शाश्वत विकास ध्येय जिल्ह्यासाठी निश्चित केली असून यामध्ये विविध निर्देशकांची संख्या दर्शविण्यात आली आहे.जिल्ह्याचे एकूण निर्देशकांची संख्या 118 इतकी आहे.या प्रगतीमापन अहवाल प्रकाशन कार्यक्रमाला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सुधाकर जाधव यांनी मानले.

 
Top