धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 जुलै रोजी सायंकाळी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून 51 जनावरांसह 405 किलो मांस, 2 आयशर टेम्पो, पिकअपसह एकूण 43 लाख 61 हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना दि.13 जुलै 2025 गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, धाराशिव शहरातील रसुलपुरा येथील अलीम कुरेशी यांचे घराचे बाजूस कंपाउडचे आतमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करत आहे. व त्याचे घराचे पाठीमागे वाहनामध्ये कत्तलीसाठी गायी आणलेल्या आहेत. तसेच कुरेशी समाजाच्या मोकळ्या जागेत कत्तलीसाठी गायी बांधलेल्या आहेत. अशी बातमी मिळाल्यावरुन पोलीस पथकाने वैराग नाका ते भिमनगर कडे जाणारे रोडवर अलीम कुरेशी यांचे घराचे पाठीमागील कुरेशी समाजाचे मोकळ्या जागेजवळ रात्री 7.40 वाजता छापा टाकला.
सोलापूर, पुणे जिल्ह्यातील जनावरे
पथकाने नमुद ठिकाणी लावलेले दोन आयशर टेम्पो व पिकअपची पाहणी केली. आयशर क्र. एमएच 45-0927 चा चालक मुज्जमिल शाकीर शेख, वय 20 वर्षे, रा. पंचवटी स्टॉप, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर याच्या आयशरमध्ये 13 काळ्या पांढऱ्या रंगाच्या जर्शी गायी दिसुन आल्या. तसेच जवळच उभा असलेला पिकअप क्र. एमएच 12 ईक्यु 3778 चा चालक इंद्रजित विश्वास पैठणकर, वय 37 वर्षे, रा. मालेगाव बुद्रुक, आयआरआर कॉलनी, मालेगाव ता. बारामती जि.पुणे याच्या गाडीत 4 तांबड्या पांढऱ्या रंगाच्या जर्शी गायी व 25 लहान वासरे दिसुन आले. तसेच बाजसू उभा असलेला आयशर टेम्पो क्र. एमएच 12 एआर 9825 मध्ये 8 काळ्या पांढऱ्या रंगाच्या 8 गायी व एक कारवड असे एकुण 09 जनावरे दिसुन आली. यावर पथकाने गायी व वासरे असे एकुण 51 जनावरे व 405 किलो मांस, दोन आयशर टेम्पो व पिकअपसह एकुण 43 लाख 61 हजार रूपये किंमतीचा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद मुद्देमालासह आरोपी अलिम मजिद कुरेशी, मुज्जमिल शाकीर शेख, इंद्रजित विश्वास पैठणकर यांना धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
यांनी केली कामगिरी
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हावलदार समाधान वाघमारे, विनोद जानराव, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, बबन जाधवर, अशोक ढगारे, चालक पोलीस हावलदार विजय घुगे, पोलीस ठाणे धाराशिवचे पोलीस हावलदार आडगळे, पोलीस अमंलदार राम कनामे, दंगा काबु पथक, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अधिकारी अमंलदार यांच्या पथकाने केली आहे.