धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे व स्वराज उर्फ पिनू तेलंग या 2 आरोपींना धाराशिव येथील न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनवली आहे. पोलिसांच्या दोषारोप पत्रानुसार कणे व तेलंग हे तस्कर गटातील आरोपी आहेत. ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असून, अलोक शिंदे, उदय शेटे व विनोद उर्फ पिटू गंगणे या 3 आरोपींना जामीन मिळाला आहे. 11 आरोपी फरार असून, 21 आरोपी धाराशिव येथील कारागृहात आहेत. जिल्हा सरकारी वकील ॲड. महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजू मांडली.
38 पैकी 11 आरोपी फरार असून, त्यांना अटक करणे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सर्व फरार आरोपींना 15 ऑगस्टपर्यत अटक करून जामीनावर असलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी असे आदेश दिल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. 7 आरोपींचे जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांच्या कार्टात सुनावणी स्तरावर प्रलंबित आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, नानासाहेब खुराडे व दुर्गेश पवार या 3 जणांच्या जामीन अर्जावर 30 जुलै, पिट्टा सुर्वे व शामकुमार भोसले या 2 जणांच्या अर्जावर 25 जुलै, रणजीत पाटील यांच्या अर्जावर 28 जुलै तर नियमित सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे.