धाराशिव (प्रतिनिधी)-  केंद्रीय 11 वी प्रवेश ऑनलाइन प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत युवासेनेने धाराशिव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यामध्ये संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

युवासेनेचे तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची केंद्रीय ऑनलाइन प्रणाली ही विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक व सुलभ असायला हवी होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी या प्रणालीचा गैरवापर करत, प्रवेश अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशासाठी स्वतंत्रपणे 3 हजार ते 12 हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले आहे.

युवासेनेने यावर रोष व्यक्त करत म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना अगोदरच फॉर्म भरताना आवश्यक सर्व माहिती ऑनलाइन पोर्टलवर दिली जाते. त्यानंतरही कॉलेज प्रशासन त्याच माहितीच्या आधारे पुन्हा प्रवेशासाठी वेगळ्या अर्जाची मागणी करत आहे. या अर्जाच्या नावाखाली हजारोंचा आर्थिक भुर्दंड लावला जातोय.

जर लवकरच योग्य ती कार्यवाही न झाल्यास युवासेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी युवासेना तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी, संकेत सुर्यवंशी, अविनाश शेरखाने, सावन देवगिरे, राहुल सिरसाठे, सिद्दीक तांबोळी, राकेश कचरे, दत्तात्रय सुर्यवंशी, लखन सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

 
Top