तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून, यासाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, धाराशिव जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात उसाचे क्षेत्र 55 हजार हेक्टरहून अधिक असले तरी, सध्याची उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कृषी विज्ञान केंद्र, बारामती, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने उसातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे प्रयोग यशस्वीरित्या सुरू आहेत. या प्रयोगातून असे दिसून आले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे उत्पादनात 40% पर्यंत वाढ, पाणीवापरात 30% पर्यंत बचत, उत्पादन खर्चात 25 ते 30% पर्यंत बचत, पारंपरिक पद्धतीपेक्षा 50 ते 70% अधिक नफा आणि संभाव्य कीड व रोगांची आगाऊ माहिती असे विविध फायदे शेतकऱ्यांना मिळतात. या तंत्रज्ञानामध्ये हवामान केंद्रे आणि मातीमधील सेन्सरचा वापर करून शेतकऱ्यांना पिकांबाबत अचूक माहिती दिली जाते.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी धाराशिव रविंद्र माने, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे, तसेच जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक आणि शेतकी अधिकारी उपस्थित होते.


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शेतकऱ्यांना लाभ देणार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आजची बैठक महत्त्वपूर्ण ठरली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी  प्रति हेक्टरी 25,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एक लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. या खर्चापैकी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 9,250 रुपये, साखर कारखाने 6,750 रुपये आणि शेतकऱ्यांचा 9000 रुपयांचा हिस्सा असणार आहे.

 
Top