धाराशिव (प्रतिनिधी)- या पावसाळ्यात जिल्ह्यात 50 लक्ष वृक्षांची लागवड व संगोपन मोहीम राबविण्यात येणार आहे.यामध्ये 19 जुलै रोजी एका दिवसात 15 लक्ष वृक्षांची लागवड करण्यात येणार असून,ही मोहीम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्याचा प्रयत्न राहणार आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना विश्वासात घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आयोजित वृक्ष लागवड व संगोपन मोहिमेच्या आढावा बैठकीत पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले,विभागीय वन अधिकारी बी.एस.पोळ, सामाजिक वनीकरण उपसंचालक श्री.करे,शिक्षणाधिकारी अशोक पाटील,सुधा साळुंके,उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड,संजय पाटील,नगरपालिका प्रशासनाचे अजित डोके,सांख्यिकी विभागाचे उपसंचालक सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, “वृक्ष लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची पाहणी नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत करावी. लागवडीसाठी लागणारे मनुष्यबळ निश्चित करून त्याची यादी तयार करावी.रोपांची वाहतूक,लागवड साहित्य,पाणी,खत आदी सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे.असे त्यांनी सांगितले
डॉ.घोष म्हणाले की,“ग्रीन धाराशिव या मोहिमेअंतर्गत होणारी वृक्ष लागवड ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात व्यापक जनजागृती करावी. धरमकर यांचेही भाषण झाले. या आढावा बैठकीस सर्व तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.