तुळजापूर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने सर्वांगीण शाश्वत विकास संस्थेच्या वतीने मौजे भातंब्री येथील माळरानावर एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. “योग, निसर्ग आणि शाश्वत विकास“ यांचा त्रिवेणी संगम साधणाऱ्या वृक्षारोपण व जलपूजन कार्यक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा सशक्त संदेश दिला.
या उपक्रमाचे उद्घाटन अतुल कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण) यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण व जलपूजन करून करण्यात आले. याप्रसंगी अतुल कुलकर्णी म्हणाले की, “योग ही केवळ वैयक्तिक शुद्धी नव्हे, तर निसर्गाशी सुसंवाद साधणारी जीवनशैली आहे. वृक्षारोपण आणि जलपूजन या संस्कारांतून आपण पृथ्वीबद्दलची आपुलकी आणि आदर व्यक्त करतो. योगामुळे व्यक्ती समतोल राखतो. तर वृक्षारोपण व जलसंधारणामुळे पर्यावरण संतुलित राहते. आज लावलेले रोप उद्याच्या पिढीसाठी जीवनदायी सावली ठरेल. युवकांनी पर्यावरण रक्षणाच्या कार्यात पुढाकार घ्यावा, हीच खरी देशसेवा असल्याचे याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी गणेश चादरे, म्हणाले की, “योग ही फक्त शारीरिक क्रिया नसून, ती विचार, कृती आणि निसर्गाशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. याप्रसंगी, डॉ. दयानंद वाघमारे यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमात स्थानिक जैवविविधतेशी सुसंगत झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण व जलपूजन करताना उपस्थितांनी झाडे लावा, झाडे जगवा, “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा संकल्प घेतला. या कार्यक्रमास सर्वांगीण शाश्वत विकास संस्थेचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.