परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यात बिबट्याचे पुन्हा आगमन झाले आहे. तालुक्यातील ब्रम्हगाव येथील हिंगणकर यांच्या वस्तीवरील रेड्यावर बिबट्याने हल्ला करून रेड्याला 150 फुटांपर्यंत ओढत नेत त्याचा फडशा पाडला.
दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील कपिलपुरी येथे बिबट्याला पकडले होते. परंतु आता पुन्हा ब्रम्हगाव शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ब्रम्हगाव येथील महादेव हिंगणकर यांच्या शेतवस्तीवरील रेड्यावर बिबट्याने शनिवारी मध्यरात्री हल्ला करून रेड्याचा फडशा पाडला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच रूपेश काळे यांनी वनविभागाला माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. हल्ला झालेल्या ठिकाणी कॅमेरे बसवणार असल्याची माहिती दिली. संपूर्ण तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला दोन महिन्यापूर्वीच कपिलपुरी येथे वनविभागाने पकडून सुरक्षित स्थळी सोडले होते. बिबट्या पकडला गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. परंतु शनिवारी रात्री ब्रम्हगाव येथे रेड्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वर्षभरापासून बिबट्याने परंडा तालुक्यातील अनेक गावातील 20 ते 25 जनावरांवर हल्ले केले होते. बिबट्या पुन्हा दाखल झाल्याने पशुपालकांची काळजी वाढली आहे.