धाराशिव (प्रतिनिधी)-  लाडक्या लेकीच्या लग्न सोहळयात रक्तदान शिबिराचे आयोजन करून आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी अनोखा सामाजिक संदेश दिला. लग्न सोहळ्यात उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले. तब्बल 51 जणांनी रक्तदान करून शिबिरास प्रतिसाद दिला. काळे कुटुंबियांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांची कन्या दिप्ती आणि अनिल पवार यांचे पुत्र अजिंक्य यांचा विवाह धाराशिव येथील हातलाई मंगल कार्यालयात शुक्रवारी थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विवाह सोहळ्यापूर्वी मंगल कार्यालयातच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या सोहळ्याला उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 51 जणांनी रक्तदान केले.

या विवाह सोहळ्याला आय. जी. दत्तात्रय मंडलिक, आदिवासी पारधी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. गोपी (तेलंगणा), तेलंगणा प्रदेशाध्यक्ष सुधाकर पारधी,  केरळा प्रदेशाध्यक्ष सी.सुब्रमण्यम, संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंके,

महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राणा सोनवणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, भाजपाचे  माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे,युवराज नळे, बापू पवार, दत्ता पेठे, शामभाऊ कुलकर्णी, सय्यद खलील,दौलत निपाणीकर तसेच आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश सदस्य तथा जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.


समाजाचे आपण देणे लागतो. सध्या रक्तपेढ्यांमध्ये असणारी रक्ताची गरज ओळखून मुलीच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आपण रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजाला सकारात्मक संदेश दिला आहे. सर्व घटकांनी अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमाचे अनुकरण करावे, असे आवाहन आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी केले.

 
Top