धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणावरून पुन्हा एकदा खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना पोलिसावर कोणाचा दबाव आहे पोलीस मुख्य अकापर्यंत का पोहोचत नाही असा सवाल खासदार राजे निंबाळकर यांनी विचारला आहे तर विकासकामांचा धडाका सुरु असल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाल्याने असे बोलत असल्याचा पलटवार भाजपने केला आहे.
खा. राजेनिंबाळकर तसेच ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आ. कैलास पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, की तुळजापूरचे भाजप आ. पाटील यांना ड्रग्जची महिती डिसेंबर 2023 मध्येच होती. त्यांचा एक कार्यकर्ता ड्रग्जच्या आहारी गेल्याने आ. पाटील यांनी त्याला विविध रुग्णालयांत दाखल केले होते. त्याचवेळी आ. पाटील यांनी हि माहिती पोलिसांना का दिली नाही. त्यांना त्यांची निवडणूक महत्वाची होती. म्हणून त्यांनी ही माहिती लपवली. पोलिसांवरही राजकीय दबाव असल्यानेच अजूनही सर्व आरोपीना अटक होऊ शकलेली नाही. 37 आरोपी निष्पन्न असताना केवळ 19 आरोपी अटक आहेत. तर 18 अजूनही फरार आहेत. याबाबतची सर्व माहिती घेऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना भेटणार आहे, असा इशारा दिला. या समस्येवर आम्ही लोकसभेत, आ. कैलास पाटील यांनी विधानसभेत आवाज उठविला पण तुळजापूरच्या आमदारांनी काहीच आवाज उठविला नाही, अशी टीकाही खा. राजेनिंबाळकर यांनी केली.