धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील पार्वती हॉस्पीटल या खासगी दवाखान्यात मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास काही तरूणांनी धुडगूस घालत मोडतोड केली आहे. यात रूग्णालयातील साहित्याचे नुकसान झाले आहे. मोडतोड करणाऱ्या अज्ञात तरूणांनी कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली असल्याची तक्रार या दवाखान्याच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान धाराशिव शहरातील सर्व खासगी डॉक्टरांनी एक दिवसीय संप करीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देवून या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

धाराशिव शहरातील राम नगर भागात डॉ. दिपिका सस्ते यांचे पार्वती हॉस्पीटल आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या पोटात दुखत असल्यामुळे एक तरूण आपल्या आई आणि पत्नीसह दवाखान्यात आला. दवाखान्याची वेळ संपली असल्याची सबब त्याला सांगण्यात आली. त्यामुळे रूग्णालयातील कर्मचारी आणि तरूणामध्ये शाब्दीक चकमक झाली. यातून ताणतणाव वाढत गेला. त्यानंतर काही अज्ञात तरूणांनी दवाखान्यातील वस्तू व एका वाहनाची तोडफोड करण्यात आली. जाणीवपूर्वक उपचार देण्यास पार्वती हॉस्पीटलने नकार दिला असल्याचा आरोप रूग्णाच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. दरम्यान या सगळ्या कृत्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. 

बुधवारी शहरातील सर्व खासगी डॉक्टरांनी एक दिवसीय संप पाळला. दिवसभर सर्व खासगी रूग्णालये बंद होती. त्यानंतर आयएमएच्यावतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देवून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

 
Top