धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयात अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक अर्थात बोगस डॉक्टर कुठे प्रॅक्टिस करत आहे का याचा शोध तालुकास्तरीय पथकाने आकस्मिक भेटी देऊन घ्यावा.असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 24 जून रोजी आयोजित अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक अर्थात बोगस डॉक्टर शोध समितीची जिल्हास्तरीय बैठक पुजार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आदी समिती सदस्य उपस्थित होते.
पुजार म्हणाले की,जिल्हयात बोगस डॉक्टर प्रॅक्टीस करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने संबंधित तालुकास्तरीय पथकाने त्या ठिकाणी भेट देवून कारवाई करावी.ज्या इमारतीत वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करतात त्या इमारत मालकाची एनओसी त्यांच्याकडे असली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुध्द सन 2020 ते 23 जून -2025 अखेर जिल्हयात 72 कारवाया करण्यात आल्याचे सांगून डॉ.हरीदास म्हणाले की, यामध्ये 36 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून 20 प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे.5 प्रकरणात बोगस डॉक्टर असल्याचे सिध्द झाले तर 11 प्रकरणे सुटल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हयातील ग्रामीण भागात 476 वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची संख्या आहे.तर ग्रामीण भागात 25 डॉक्टरांची बॉम्बे नर्सिग ॲक्टनुसार नोंदणी आहे. तुळजापूर तालुक्यात खाजगी वैद्यकीय व्यवसायिक डॉक्टरांची तपासणी विशेष मोहिम राबविण्यात आली. एकूण 3 पथकाने प्रत्येकी 5 वैद्यकीय व्यवसायिकांची तपासणी केली असता केवळ एक योग्य अर्हता असलेले वैद्यकीय व्यवसायिक आढळून आले.एक वैद्यकीय व्यवसायिकांकडे त्रुटी दिसून आल्या. तपासणीच्या या विशेष मोहिमेत एकूण 14 वैद्यकीय व्यवसायिकांचे दवाखाने बंद आढळुन आल्याची महिती डॉ.हरीदास यांनी दिली.