धाराशिव (प्रतिनिधी) - अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मेसा जयकुमार जानराव यांची प्रदेशाध्यक्ष बाली मंडपू यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन दि. २१ जून रोजी निवड करण्यात आली.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात मेसा जानराव यांची निवड करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाली मंडपू, प्रदेश सचिव राहुल टाक, पूर्व विभाग अध्यक्ष राजीव मारुडा, गुलाब वाला पूजा वाला, सचिन परमार, संदीप अंकुशराव, सोमनाथ गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाली म्हणाले की, महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिका व इतर क्षेत्रांमध्ये सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारशी लागू करून त्याचा लाभ द्यावा यासाठी आम्ही लढा देत आहोत. या शिफारशी लागू करण्यासाठी ज्या नगरपालिका व महानगरपालिकेत कामगारांची प्रकरणी प्रलंबित आहेत ते निकाली काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे सांगत ते म्हणाले की, या कामगारांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे बजेट आहे. त्या माध्यमातून त्यांना मोफत घरे बांधून देण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली. तसेच या कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिपची देखील सुविधा हे मात्र राज्यात त्याचा कुठेच अंमल केल्याचा दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या पाल्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी तरतूद आहे मात्र त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यांच्या मुलांना उद्योगासाठी ५ ते ५० लाख रुपयांचे विनातारण कर्ज देऊन व्यवसायाची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. आज घडीला राज्यांमध्ये शासकीय आकडेवारीनुसार पाच लाख सफाई कामगार काम करीत आहेत. तसेच राज्यामध्ये दोन लाख सफाई कामगारांची भरती करण्यात यावी. त्यांना आर्थिक सामाजिक व राजनीतिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी लवकरच या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग ताक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या आयोगाचे अध्यक्ष, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, मेडिकल हॉस्पिटलचे प्रधान सचिव, नगर विकास प्राधिकरणचे प्रधान सचिव यांची बैठक घेऊन सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने कामगारांच्या हितासाठी निर्णय घ्यावा असे सांगत ते म्हणाले की, या कामगारांच्या हितासाठी आम्ही सरकारशी दोन हात करायला तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी मेसा जानराव यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top