तुळजापूर (प्रतिनिधी)- मंदिर संस्थानने तुळजाभवानी मातेचा भारतमाता म्हणून उल्लेख केल्याने माध्यमांत उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता जुन्या कागदपत्रांत संदर्भ सापडल्याने भारतमाता म्हणून उल्लेख केला होता. मात्र वाद निर्माण झाल्यानंतर सुधारित पत्र काढल्याचे तहसीलदार बोळंगे यांनी सांगितले.
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यांतर्गत रामदरा तलाव येथील डोंगरावर प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देताना तुळजाभवानी मातेचे 108 फुटी शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प कसे असावे, याबाबत मंदिर संस्थानाने पुजारी मंडळाला पत्रातून अभिप्राय मागितला होता. त्या पत्रात तुळजाभवानी माता, भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामींनी असा उल्लेख केला होता. दरम्यान, तुळजाभवानी माता मंदिर संस्थानने भारतमाता म्हणून उल्लेख केल्याने माध्यमांत चर्चा सुरू झाली होती. माध्यमांनी वाद निर्माण केल्यानंतर मंदिर संस्थानने सावध पवित्रा घेत सुधारित पत्र काढत वाछ टाळण्याचा प्रयत्न केला आहे.