तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीरामध्ये, मंदिराच्या जीर्णोद्धार व दुरुस्ती कार्यासंदर्भात आवश्यक त्या शास्त्रसमुचित अंगभूत अनुष्ठानाची पूर्णता सोमवार, दि. 16 जून 2025 रोजी अत्यंत मंगलमय व वैदिक पद्धतीने संपन्न झाली.

सदर अनुष्ठान वैदिक आचार्य वेदमूर्ती श्री केशव अयाचित (आळंदी) यांच्या आचार्यत्वाखाली, तसेच आहिताग्नी ब्रह्मवेत्ता सुधाकर शास्त्री कुलकर्णी (पुणे) यांच्या ब्रह्मत्वात, प्रतिष्ठामौक्तिक ग्रंथातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडले. या अनुष्ठानासाठी काशी क्षेत्रातून आलेले पद्मश्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांचे मार्गदर्शन लाभले. या धार्मिक क्रियाक्रमात देवीची अनुमती घेऊन प्रायश्चित्तानुष्ठान, मुहूर्तशुद्धीचे द्रव्यदान, प्रधान संकल्प, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, देवीची विशेष पूजा, भगवान शंकराची विशेष पूजा, नवचंडी यज्ञ, अघोरमंत्रजप व अघोरहवन, व्याहृति होम, प्रासादतत्त्व होम, देवी आयुध होम, प्रासादतत्त्वन्यास, होमाड्ग प्रायश्चित होम, लक्ष्मी होम, अवभृथ जलप्रोक्षण, ब्राह्मण पूजन व आशीर्वाद ग्रहण इत्यादी विधी पूर्ण निष्ठेने पार पाडण्यात आले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त ओंकार देशमुख, तसेच तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांची विशेष उपस्थिती होती. देवतापूजन, हवन व प्रधान संकल्प आदी प्रमुख पूजाविधी मनोज ठाकरे यांनी ब्राह्मण मंडळाच्या साहाय्याने सुयोग्य रीतीने पूर्णत्वास नेले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमधून आलेल्या महंत व गोसावी बांधवांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. संपूर्ण विधी काळात मंडपातील वातावरण अतिशय प्रसन्न, सात्विक व मंगलमय होते, सर्वत्र सकारात्मक ऊर्जा अनुभवास आली. या पवित्र प्रसंगी, श्री जगदंबा मातेच्या कृपेने सर्वत्र क्षेम, शांतता व समृद्धी नांदावी, हीच सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

 
Top