धाराशिव (प्रतिनिधी)- जन्मत:च मायेचा आधार हरवलेल्या निरागस चिमुकल्यांना जीवदान देणाऱ्या सह्याद्री अंकुर शिशुगृहास अंजुमन वेल्फेअर सोसायटीच्या वतीने नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली. शिशुगृहातील बालकांच्या पोषणासाठी 13 हजार रुपयांची दूध पावडर देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे बालकांच्या पोषणात मोलाचा हातभार लागला असून विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सह्याद्री अंकुर शिशुगृह हे विशेष दत्तक संस्था म्हणून कार्यरत असून येथे 0 ते 6 वयोगटातील अनाथ, बेवारस व टाकाऊ अवस्थेतील बालकांना आश्रय दिला जातो. त्यांच्या आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासाची व्यवस्था येथे करण्यात येते.

या शिशुगृहात नुकतीच आनंददायी घटना घडली आहे. एका महिन्यापूर्वी दोन अनाथ बालकांना दत्तक प्रक्रियेद्वारे नवीन पालक मिळाले. विशेष म्हणजे ही दोन्ही बालके जन्मल्यानंतर काही तासातच शिशुगृहात दाखल झाली होती. सध्या ही मुले आपल्या नव्या कुटुंबात आनंदात आहेत. या यशस्वी दत्तक प्रक्रियेने शिशुगृहाच्या कार्यास नवी प्रेरणा मिळाली आहे.

या कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. शफिक अहमद मुंडेवाड, सह्याद्री अंकुर शिशुगृहाचे डॉ. दिग्गज दापके-देशमुख, गणेश वाघमारे, गजानन पाटील, इश्वर राठोड, तसेच डॉ. अरशद सय्यद, जाकेर सय्यद, शशिकांत करंजकर, अभिजित शेळके, अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


अनेकांना मदत

कार्यक्रमावेळी अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पल्ला यांनी सांगितले की, “अनाथ बालकांना जीवनाचा नवा आधार देणे ही खरी मानवता आहे. अशा कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे. नुकतेच संस्थेच्या वतीने शेख फातिमा या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या हृदयविकार उपचारासाठी 35 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. याशिवाय संस्थेने आतापर्यंत शेकडो गरजूंना दानशूरांच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. भविष्यातही अशी मदत सुरू राहील अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. 

 
Top