भूम (प्रतिनिधी)- तालूक्यातील माणकेश्वर पासून जवळच आसलेल्या भूम ते बार्शी रोडवर देवंग्रा परिसरातील पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवार दि. 23 रोजी सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एक जेष्ठ महीला जागीच मयत झाली. यामध्ये पाच ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना घडताच परिसरातील नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अगोदर जखमींना गाडीच्या बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ पोलीस व रुग्णवाहिकेस संपर्क करूण घटनेची माहिती दिली.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार चिखर्डे ता.बार्शी येथील काही जण आपल्या नातेवाईकांसह भूम येथील मयत पाहुण्याची राख सावडण्याच्या विधी साठी भूम येथे जात होते. बार्शी भूम रोड वरील देवंग्रा गावच्या शिवारात टेंम्पो रस्त्याच्या कडेला पलटी होउन गंभीर अपघात झाला. या मध्ये हावई देविदास तुपेरे वय 65 वर्ष रा. चिखर्डे ता बार्शी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर पाच ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रूग्ण वाहीका बोलावून बार्शी येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मयत महिलेवर माणकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
यावेळी अपघातात हनुमंत मधूकर तुपेरे, रामभाऊ लांडगे, हरीभाऊ भिमराव रामगुडे, शामभाऊ लांडगे, सुरेखा सुभाष तुपेरे, अनिता सतीश तुपेरे, विद्या बबलू लंकेश्वर, संगीता हनुमंत तुपेरे सर्व रा. चिखर्डे ता. बार्शी हे जखमी झाले आहेत. घटनेची माहीती मिळताच परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर, पोलीस हवालदार एस. डी. घोळवे, पोलीस नाईक बी. आर. काकडे, पोलीस नाईक स्वामी, पो.कॉ. एस.एम. कोळेकर यांनी घटना स्थळाला भेट देवून जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी पाठवले व मयत महिलेच्या प्रेतास माणकेश्वर आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दुपारी तीन वाजता त्यांच्यावर चिखर्डे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक बी.आर.काकडे करीत आहेत.