तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागात ‘सिंबायोसिस स्किल युनिव्हर्सिटी, पुणे' आणि ‘कॅपजेमिनी' या सॉफ्टवेअर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षातील 92 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी 300 तासांची “जावा आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंट” विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
यात महेंद्रनाथ यादव आणि नंदन गौरीशंकर हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर बोलताना म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी कार्यशाळेदरम्यान नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले असून त्यामुळे नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संगणक विभागप्रमुख प्रा. जे. एम. शेख, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. व्ही. व्ही.पतंगे, तसेच प्रा. डी. जे. वाघमारे मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संतोष एकदंत यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश नवगिरे आणि नितीन कुलकर्णी यांचे विशेष योगदान लाभले.