तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास आई तुळजा भवानी मातेची सेवा मानुन केल्याची माहीती तामलवाडी पोलिस स्टेशनचे एपीआय तथा ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारी गोकुळ ठाकुर यांनी दिली.                  

यावेळी पुढे बोलताना ठाकुर पुढे म्हणाले की, तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास दोन महिने सतरा दिवस सलग अठरा तास काम करुन केला. तपास करताना कुणाचाही दबावाला बळी न पडता चार्ज शीट दाखल केले. पुरावा असलेल्यांनाच आरोपी केले. तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेनेच केला असुन तपासात कुणालाही सोडले नाही. तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे राज्यासह देशभरात गाजत असुन या ड्रग्ज तस्करीत एकुण 36 आरोपी आहेत. या ड्रग्जप्रकरणी पोलिसांनी सोलापूर, पुणे, मुंबई, धाराशिव अशा विविध ठिकाणावरून आरोपींना अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणातील 36 आरोपींपैकी 15 जणांना पोलिसांनी अटक केली असुन 21 आरोपी फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 10 हजार 744 पानी दोषारोपपत्र दाखल केले असुन आरोपीवर संगणमताने ड्रग्ज खरेदी, विक्री, ड्रग्ज साठवणुक, ड्रग्ज विक्रीतुन बेकायदेशीर अर्थिक फायदा  कमवणे, ड्रग्ज सेवन करणे असा ठपका ठेवून कार्यवाही करण्यात आली आहे. 


कोणालाही सोडणार नाही

या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असुन फरार आरोपींच्या नातेवाईकांना तामलवाडी पोलिस ठाण्यात बोलावुन खोलवर तपास करण्यात येत आहे. फरार आरोपींचे नातेवाईक कुठल्या राज्यात,जिल्ह्यात आहेत त्यांची इत्यंभूत माहिती फरार आरोपींच्या नातेवाईकांकडुन तसेच मित्रांकडून घेतली जात आहे. तसेच पुणे येथील फरार आरोपी अटक करण्याच्या अनुषंगाने आरोपींचे नातेवाईक, मित्र अशा सर्वांची चौकशी करण्यासाठी त्यांना तामलवाडी पोलिस ठाण्यात बोलावुन घेऊन सखोल चौकशी करण्यात येत आहे.  तसेच तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेनेच चालु असुन लवकरच फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. तसेच या ड्रग्जप्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही मग तो कोणीही असो असे स्पष्ट केले.

तसेच हा तपास पोलीस अधिक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख, व जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे व यांच्या मार्गदर्शनाखालीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचेही गोकुळ ठाकुर यांनी सांगितले.

 
Top