धाराशिव (प्रतिनिधी)-  जल व्यवस्थापन पंधरवाडा समारोपाच्या कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रामदारा तलावात लवकरच पाणी आणून दाखवा असे आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाणी आणण्यासाठी ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट 2025 मध्ये रामदरा तलवात पाणी येणार असे प्रतिउत्तर दिले. यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी लोकप्रतिनिधींना जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रचंड आस्था आहे असा टोला लगावत मी सुध्दा विकासासाठी पाठपुरावा करेन असे सांगितले. 

जलव्यवस्थापन पंधरवडा समारोपाचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधींमध्येच उजनीच्या पाण्यावरून आक्रमकता दिसून आली. व्यासपीठावर पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, पोलिस अधीक्षक संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके आदी उपस्थित होते. 

खासदार राजेनिंबाळकर यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. सरकार एकीकडे सांगतेय पाणी बचाव, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची कोंडी करत आहे. जिल्ह्यात पाणीच नाही तर वाचवणार काय ? प्राधान्य क्रमाच्या घोळामुळे कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचे पाणी आले नाही. अख्खी पिढी जायच्या मार्गावर आहे. परंतु तुळजापुरातील रामदरा तलावात आणखी पाणी आलेले नाही. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देत शेतकऱ्यांना शेतातून पाईपलाईन टाकून पाणी आणायचे म्हटले तरी मोठ्या अडचणी येतात. असाच प्रकार कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेबाबत घडला आहे. तरी आता आम्ही झारीतील शुक्राचार्य दूर केले आहेत. ऑगस्टमध्ये योजनेचे पाणी रामदरा तलावात येणार आहे. यासाठी वेगाने काम सुरू आहे. परंडा, भूम, वाशी व काही कळंबच्या भागातही पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली, कोल्हापूरचे पुराचे 51 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे धोरण ठरवले आहे. यासाठी 130 किमीचा बोगदा तयार करण्यासाठी डीपीआर तयार करणे सुरू आहे. 

 
Top